जळगाव मिरर । ४ डिसेंबर २०२२
भुसावळकडून जळगावकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला सुसाट कारने मागून धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. ३० रोजी रात्री १० वाजता तरसोद फाट्याजवळ घडली आहे. बाळू दयाराम जवरे (४१, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) असे मृताचे नाव आहे. या अपघात प्रकरणी शुक्रवारी मयताच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून कार चालकाविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हरताळा येथील बाळू जवरे हे बुधवारी रात्री (एमएच. १९. एझेड.०५६५) भुसावळकडून जळगावकडे येत होते. १० वाजता तरसोद फाट्याजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या कारने (एमएच. १९. सीएफ.२७८१) जोरदार धडक दिली. या अपघातात बाळू जवरे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. याप्रकरणी बाळू जवरे यांचे चुलत भाऊ उमेश जवरे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पीएसआय राजेंद्र साळुंखे करित आहेत.