जळगाव मिरर । २६ डिसेंबर २०२२
जगभरातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने आता जगभरातील लोक घाबरून गेले आहे. तर चीन मधून दुसऱ्या देशात जाणाऱ्या नागरिकांची हि संख्या आता वाढत असल्याने देशात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवांद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कोविड-१९ पासून सावध राहण्याचे आवाहन केले. अनेक देशांत विषाणूचा फैलाव होतोय. नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक जण सहलीला जातील. त्या वेळी मास्क लावणे आणि हात धुण्यासारख्या नियमावलीचे पालन करा, असे आवाहन करून त्यामुळे आनंदावर विरजण पडणार नाही. कोरोनापासून सावध राहिल्यास सुरक्षितही राहाल, असा सल्ला मोदींनी दिला. आता २०२५ पर्यंत देशाला क्षयमुक्त करावयाचे आहे,असे ते म्हणाले. इकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मंगळवार, २७ डिसेंबर रोजी आरोग्य सुविधांची तपासणी करण्यासाठी ‘मॉकड्रील’ करण्याची सूचना केली आहे. या वेळी विलगीकरण, ऑक्सिजन, आयसीयू बेड क्षमतेचा आढावा घेतला जाईल. तसेच औषधी, रुग्णवाहिका, चाचणी किट, जिल्ह्यांमधील डॉक्टर-परिचारिकांच्या संख्येचाही आढावा घेतला जाणार आहे.
कोरोनावर चीनचे धोरण साफ अपयशी, आकडेवारी देणे बंद बीजिंग । चीनच्या आरोग्य विभागाने कोरोना आकडेवारी जारी करणेच बंद केले आहे.झीरो कोविड धोरण सपशेल अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. १ ते २० डिसेंबरदरम्यान चीनमध्ये २५ कोटी रुग्ण आढल्याची माहिती उघड झाल्यानंतर चीनने आकडेवारीवर बंदी घातली आहे. कोरोनाचा कहर असला तरीही हाँगकाँगलगतची सरहद्द चीन जानेवारीत खुली करणार आहे. तीन टप्प्यात ते करण्यात येईल. विमानतळ अथवा रस्ता मार्गावरील दोन चौक्या आधी खुल्या केल्या जातील, असे हाँगकाँगचे सीईओ जॉन ली यांनी सांगितले.
महाराष्ट्रात २० रुग्ण बरे, ३२ नवीन रुग्णांचे निदान राज्यात रविवारी २० रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ३२ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यभरात अॅक्टिव्ह रुग्ण १४८ झाले आहेत. चीनहून आग्रा येथे आलेला प्रवासी कोरोनाबाधित चीनहून २३ डिसेंबर रोजी आग्रा येथे आलेला ४० वर्षीय प्रवासी कोरोनाबाधित आढळला. उत्तर प्रदेश आरोग्य विभागाने त्याचा रक्त नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला आहे. …इकडे केरळमध्ये बर्ड फ्लू, सहा हजार पक्ष्यांची कत्तल केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात तीन पंचायतीनी बर्ड फ्लूला दुजोरा दिला आहे. शनिवारी या ठिकाणी ६ हजार पक्ष्यांची कत्तल करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बदके आहेत. लक्षद्वीप प्रशासनाने फ्रोजन चिकनच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.
