
जळगाव मिरर / २८ डिसेंबर २०२२
राज्यात सध्या सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेनेची जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी आज घोषणीत झाली आहे. यामध्ये ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्यांना जिल्ह्याची धुरा दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या कार्यालयातून जळगाव जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष, व महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या कार्यकारिणीत एक जिल्हाप्रमुख, एक महिला जिल्हाप्रमुख, 1 विधानसभा शहर संघटक, शहराध्यक्ष 2, महिला शहराध्यक्ष 2 तर वैद्यकिय प्रमुख 2 अशी कार्यकारिणी आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्यात शिंदे गटाने सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. प्रतिक्षेत असलेली जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी आज दि.28 रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी घोषित केली आहे. त्यामध्ये शिंदे गटाची जळगाव शहरासह ग्रामीण भागातील जिल्हाप्रमुखपदाची धुरा निलेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर जळगाव विधान सभा शहर संघटकपदी श्याम कोगटा, तर जळगाव शहराध्यक्षपदी गणेश सोनवणे, कुंदन काळे, तर वैद्यकिय आघाडी शहरप्रमुखपदी डॉ.खुशाल जावळे तर श्रीकांत शिंदे वैद्यकिय फाँडेशनच्या जिल्हाप्रमुखपदी जितेंद्र गवळी यांची तर महिला जिल्हा संपर्क प्रमुखपदी सरिता माळी-कोल्हे, महिला शहराध्यक्षपदी शोभा चौधरी व ज्योती शिवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील शिंदे गटातील नेते व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.




















