जळगाव मिरर / १३ जानेवारी २०२३
हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीमध्ये जळगाव शहरातील एका शाळेने ३० ते ४० विद्यार्थ्यांना आज दि १३ रोजी शाळेच्या बाहेर बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पालकांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दिली आहे.
शहरातील मेहरूण परिसरातील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत हा गंभीर प्रकार घडला. शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा प्रकार विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शिक्षण विभागाकडून अहवाल मागवला आहे. तसेच शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत अहवाल मागवला आहे. माझ्याकडे तक्रार आली होती की, काही मुलांना थंडीत सकाळी बाहेर बसवण्यात आले. त्यासाठी आम्ही याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाकड़ून मागवला आहे. तो आल्यावर कायदेशीर पद्धतीने हे प्रकरण सोडवले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
