जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील कापूसवाडी येथील तरूणाचा शेताच्या बांधावर संशयास्पद रित्या मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी नातेवाईकांनी घातपात झाल्याचा आरोप करीत पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तम रघुनाथ धोनी (वय-३८) रा. कापूसवाडी ता. जामनेर जि.जळगाव या तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे.
कापुसवाडी येथील उत्तम धोनी यांच्याकडे गावातील एका इसमाचे पैशाचा व्यवहार होता. वेळोवेळी दोघांमध्ये भांडण झाले होते. ६ एप्रिल रोजी कापुसवाडी येथे एका उत्तरकार्याचा कार्यक्रमांमध्ये पैशाच्या कारणावरून मयत संजय एकनाथ पाटील व सहा-सात जणांमध्ये बाचाबाची होऊन उत्तम धोनी यांना मारहाण झाली होती. यामुळे मयत उत्तम धोनी यांना अपमान वाटला व त्यांनी चार चाकी वाहन घेऊन शेताकडे निघाला. रात्री घरी आला नाही त्यामुळे पत्नी व नातेवाईकांनी शोधाशोध केली असता बुधवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उत्तम धोनी यांचा मृतदेह विजय उबाळे यांच्या शेतात मयत अवस्थेचा आढळून आला. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. जामनेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जामनेर पोलिसात डॉ. आर के पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीसांनी गावातील पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.