जळगाव मिरर / २० एप्रिल २०२३ ।
राज्यात तापमान जरी वाढले असले तरी राज्यातील काही भागात आता पुन्हा एकदा मराठवाडा व विदर्भात २० एप्रिल गुरुवारी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. बुधवारी विदर्भातील दहाही जिल्ह्यांत तापमानाने चाळिशी पार केली होती. सोलापूरला सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकात पारा ३८.८ अंशावर होता.
उत्तर महाराष्ट्र ते चेन्नईपर्यंत वारा खंडितता प्रणाली अद्यापही टिकून आहे. परंतु शनिवार (२२ एप्रिल) पासून विदर्भ वगळता राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळेल. राज्यातील निवडक शहरांतील तापमान सोलापूर ४२.२, मालेगाव ४२.०, जळगाव ४१.९, जालना ४१.७, बीड ४१.५, परभणी ४१.५, जेऊर ४१.०, छत्रपती संभाजीनगर ४०.६, धाराशिव ४०.३, पुणे ४०.०, सातारा ३९.९, सांगली ३९.७ ,अहमदनगर ३९.७, बारामती ३९.६, नाशिक ३८.८, डहाणू ३७.६, रत्नागिरी ३३.७ महाबळेश्वर ३३.०.




















