जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।
राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या सभेत शिंदे गटावर सडकून टिका केली. जळगावमधील शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर तर सत्तेत घुसणाऱ्या घुशी खूप पाहिल्या आहेत. त्यांना बिळातून बाहेर काढून आपटणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्याला गुलाबराव पाटील काय प्रत्युत्तर देणार?, याकडे सर्वांचे लक्ष होते.
मात्र, सभेनंतर उद्धव ठाकरेंबाबत गुलाबराव पाटील यांचा सूर मवाळ झाल्याचे दिसत आहे. आमचा उद्धव साहेबांवर राग नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाच लक्ष्य करत संजय राऊतांकडे हिंमत असेल तर त्यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान सभेनंतर गुलाबराव पाटील यांनी दिले.
सभेनंतर रात्री पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, काल पाचोऱ्यातील सभेत संजय राऊत फक्त 3 मिनिट बोलले. ते फक्त गुलाबो गॅंग बोलले आणि खाली बसले. संजय राऊतांकडे कोणतही व्हिजन नाही. उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचा राग नाही. त्यांच्या काही म्हणण्याने आमच्या प्रतिमेवर परिणाम होणार नाही. पण, ज्या माणसाने शिवसेना फोडली त्याच्यावर आमचा राग आहे. सभेत संजय राऊत यांच्या कानात कोणीतरी सांगितले असेल की शांत रहा. त्यामुळेच केवळ तीन मिनिटे बोलून संजय राऊत यांनी भाषण संपवले. गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांची लायकी काय आहे. जळगावमध्ये आमचीच शिवसेना असल्याचे ते म्हणत आहेत. राज्यात दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका होतील. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊत मर्द, नामर्द अशी भाषा करत आहेत. त्यांना या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करून दाखवेल.