जळगाव मिरर | ४ मे २०२३
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून असलेल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून नेत्यामध्ये होणारी शाब्दिक चकमकी सुरु झाल्याने राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात आता पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या नेत्याने भर पाडली आहे. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्याने उत्तर देखील दिले आहे. संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले होते. त्यांनी केलेल्या टीकेवर आता पुन्हा संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
या सगळ्याला सुरुवात झाली ती शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी थेट काँग्रेसशी राष्ट्रवादीची तुलना केली. काँग्रेसमध्येही अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. पण त्यांचा पक्ष सोनिया गांधींकडे बघून चालतो. पक्षाचा अंतिम निर्णय राहुल गांधीच घेतात. त्यामुळे राष्ट्रवादीत अध्यक्ष कुणीही झाले, तरी शरद पवार पक्षाचे सर्वोसर्वा राहतील, त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही, असे जिव्हारी लागणारे विधान संजय राऊतांनी केले होते. यासंदर्भात नाना पटोलेंनी राऊतांवर टीका केली होती.
संजय राऊतांनी चोमडेगिरी बंद करावी. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि गांधी कुटुंबावर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ज्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे. गांधी परिवाराच्या सदस्यांनी पंतप्रधानपद सोडण्यासही मागे पुढे बघितले नव्हते. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडून दुसऱ्याला दिले. संजय राऊत आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, त्यांनी इतर कोणत्या पक्षाचं प्रवक्ते व्हावं याबद्दल दादा काही दिवसांपूर्वी बोलले आहेत. त्यामुळे त्यांनी चोमडेगिरी बंद करावी, असे म्हणत नाना पटोले यांनी राऊतांना झापले होते. दरम्यान, यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून खोचक टोला लगावला. ‘ते नाना पटोले आहेत. त्यांच्या विधानाला काय एवढे गांभीर्याने घेता. त्या माणसाला? त्यांचा पक्ष त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्याला किंमत देत नाही. यावर मी राहुल गांधींशी चर्चा करेन. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात, असे खोचक प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.