जळगाव मिरर | २० मे २०२३
देशात नुकतीच दि १९ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी धोरणाला धरसोड प्रकार म्हटले. नवीन नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हे पाहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. शनिवारी नाशिक दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, “मी नोटाबंदीच्या वेळी भाषण केले होते. हा एक प्रकारचा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधी काहीतरी आणायचे, कधी बंद करायचे. त्यावेळी नोटा आणल्या तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजेच नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही पाहिले नव्हते. असे निर्णय देश स्वीकारणार नाहीत. आता पुन्हा लोक बँकेत पैसे जमा करायचे. यातून पुन्हा नव्या नोटा येतील. असे प्रयोग परवडणारे नसतात, असे राज ठाकरे म्हणाले.