जळगाव मिरर | २२ मे २०२३
कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी चांगलीच सक्रीय झाली आहे, पण महाविकास आघाडीतील अनेक नेते आपआपले पक्ष लहान भाऊ मोठा भाऊ करीत असल्याने महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा उफाळून समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. तर काँग्रेस लहान भाऊ असल्याचा उल्लेख केला होता. त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
20 मे रोजी कोल्हापूरमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम करायरचं आहे. आपली जास्त ताकद असेल तर मविआमध्ये महत्व टिकेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या त्यामुळे वाटाघाटी करताना लहान भाऊ म्हणून आम्हांला भूमिका घ्यावी लागायची. आता मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर आमच्या ५४ आहेत. हे असं गणित आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण
आज सोलापूरमध्ये बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे विधान चुकीचं नाही. आता ठाकरे गटात फक्त १६ आमदार उरले आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेट करत असतात, त्यात गैर काही नाही. राष्ट्रवादी एक असेल तर काँग्रेस दोन नंबरचा आणि उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. यात चुकीचं काही नाही.
दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. एकूणच तिन्ही पक्षांकडून एक प्रकारचं प्रेशन बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.