जळगाव मिरर | ३१ मे २०२३
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एक धरण प्रसिद्ध असून याठिकाणी अनेक जिल्ह्यातील तरुण पर्यटनासाठी येत असतात. याच धरणात मंगळवारी दोन बालक बुडाले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळील निंबादेवी धरणावर गुरांना पाणी पाजण्यासाठी आलेले निमछावी वस्तीवरील दोघे बालक अचानक बुडाल्याने एकच खळबळ उडाली असून मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले तर दुसर्या बालकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील रहिवासी आहेत. आसाराम शांतीलाल बारेला (14) व नेनू किसन बारेला (10, रा.निमछाव वस्ती) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. आसारामचा मृतदेह शोधण्यात यश आले मात्र नेनूचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. सावखेडासीम पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती देण्यात आली. अंधार होण्यापूर्वी धरणातून आसाराम शांतीलाल बारेला या बालकाचा मृतदेह काढण्यात आला मात्र नेनू बारेला या बालिकेचा मृतदेह हाती आला नाही. रात्री उशीरापर्यंत धरण परीसरात शोध मोहिम सुरू होती.