सध्याच्या युगात अनेक भागात मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेकांनी तर थेट रस्त्यावर उतरत आंदोलने सुरु केले आहे. या गोष्टीचा फायदा घेत लग्न लावून फसवणूक करणाऱ्याच्या टोळ्या देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
काय आहे घटना ?
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील तरुण कामानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. त्या ठिकाणी विवाहाचा विषय निघाल्यानंतर विजय मुळे नामक लग्न जमवणाऱ्या मध्यस्थी व्यक्तीने मुलीचे आई-वडील गरीब असून 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानंतर त्या तरुणाने दोन लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पेवर सेंड केले. पैसे मिळाल्यानंतर २५ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे बागलाण तालुक्यातील प्रवीण याचा विवाह अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावण्यात आला. यानंतर काही दिवसांनी नववधूने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. तसेच तिने मधुचंद्रासाठी देखील नकार दिला. यानंतर प्रवीणला याचा संशय आल्याने त्याने नववधूला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिने यापूर्वी बागलाण तालुक्यातील श्रीपूरवडे येथील हृषीकेश आणि साक्री तालुक्यातील काळगाव येथील चंद्रकांत यांच्याशी आपला विवाह झाल्याचे सांगितले. ही सगळी घटना ऐकून प्रवीणला मोठा धक्का बसला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर प्रवीणने थेट पोलीस ठाणे गाठून तरुणीला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर त्याने विजय रामभाऊ मुळे, पूजाचे वडील असल्याची बतावणी करणारा एक अनोळखी इसम, अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.