
जळगाव मिरर । ४ जून २०२३

शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी परीसरातील गोपाल दालमील परीसरात रविवारी सकाळी सात वाजता जलाराम चटाई कंपनीतील ४० वर्षीय कामगार तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चंद्रशेखर रमेश सपकाळे (40, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृताचे नाव असून मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील चंद्रशेख सपकाळे हा पत्नी, आई व मुलासह वास्तव्याला होता. एमआयडीसी परीसरातील जलाराम चटाई कंपनीत कामास होता. चंद्रशेखरचे दोघे भाऊ मिरचीचा व्यवसाय करीत असल्याने शुक्रवारी आणि शनिवारी त्यांना मदत करण्यासाठी तरुण गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजेनंतर कामाच्या निमित्ताने एमआयडीसीतील त्याच्या कंपनीत गेला. रात्री उशीरापर्यंत चंद्रशेखर हा घरी न आल्याने शोध सुरू असताना रविवारी सकाळी वाजता जलाराम चटाई कंपनीजवळील गोपाल दालमील कंपनीजवळ त्याचा मयतस्थितीत मृतदेह आढळला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. चंद्रशेखर याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी 10 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई सुशिलाबाई, पत्नी छाया, मुलगा जयेश (7), मनोज व शशिकांत हे दोन भाऊ आहेत.




















