जळगाव मिरर | ९ जून २०२३
गेल्या काही महिन्यापासून केद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकी सोशल मिडीयाद्वारे मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही धमकी दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली.
या प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
