
जळगाव मिरर | १३ जून २०२३

जळके गावातील कृष्णा ज्वेलर्स दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी २ लाख १५ हजार रूपयांची चांदी, १० हजार रूपयांची रोख रक्कम आणि १० हजार रूपये किंमतीचे डिव्हीआर चोरून नेले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरी बुद्रुक (ता. जामनेर) येथील मनोज प्रकाश पाटील यांचे जळके गावामध्ये कृष्णा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी ५:३० वाजता पाटील हे दुकानाला कुलूप लावून घरी निघून गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून चांदीसह रोकड चोरून नेली. सोमवारी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वसंतवाडी येथील सरपंच विनोद पाटील यांना ही घटना दिसताच त्यांनी मनोज पाटील यांना संपर्क साधून दुकानामध्ये चोरी झाल्याचे कळविले. विनोद पाटील लागलीच दुकान गाठले. त्यावेळी त्यांना दुकानाचे शटरचे लॉक तुटलेले दिसले. तर दुकानातील तिजोरी फोडलेली होती. त्यातील २ लाख १५ हजार रूपये किंमतीची २४०० ग्रॅम चांदी तसेच १० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची दिसून आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर सुध्दा गायब झालेला दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्यासह पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.




















