
जळगाव मिरर | १७ जून २०२३

भुसावळ तालुक्यातील एका शाळेत ९ वीच्या वर्गात विद्यार्थ्याच्या गावठी कट्टा आढळल्याने शाळेसह तालुका परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. १४ रोजी शुक्रवार सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने शाळेत प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठीत शाळेतील विद्यार्थ्याकडेच गावठी कट्टा आढळल्याने या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे तर या विद्यार्थ्याने हा कट्टा कुठून वा का आणला? या बाबीचा फैजपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे. भुसावळातील एका भागातील रहिवासी असलेल्या कर्मचार्याचा मुलगा अकलूदजवळील पोदार शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला. शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




















