जळगाव मिरर | २० जून २०२३
ज्याठिकाणी साखरपुडा असो वा लग्न कार्यक्रम असो अशा ठिकाणी अनेक अनोळखी व्यक्ती देखील सहभागी होत असतात, अशाच एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला अनोळखी व्यक्ती सहभागी होत चक्क २६ तोळे वजनाचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील सौभाग्य लॉनमध्ये चुंचाळे देवेंद्र नारायण चौधरी (५३) यांच्या मुलीचा सोमवारी साखरपुडा होता. सोमवारी दुपारी १२ ते १.३० वाजे दरम्यान साखरपुडा असल्याने वर्हाडींची लगबग सुरू असताना त्यांनी दागिणे एका बॅगमध्ये 26 तोळे वजनाचे दागिणे ठेवले होते. सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅगेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखरपूड्यात मोठी खळबळ उडाली.
बॅगेत दोन लाखांचा सोन्याचा नेकलेस, साडेचार लाखांचा व नऊ तोळे वजनाचा मोठा सोन्याचा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या, 50 हजार रुपये किंमतीचे कानातले, 14 हजार रुपये किंमतीच्या साकळ्या, सात हजारांचा चांदीचा छल्ला असा एकूण 11 लाख 71 हजारांचा ऐवज होता. बॅग चोरीची माहिती मिळताच डीवायएसपी कृषिकेश रावळे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी देवेंद्र नारायण चौधरी (53, चुंचाळे, ता.चोपडा) यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत.