जळगाव मिरर | २१ जून २०२३
जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या एका ठिकाणी रिक्षातून नेत रिक्षा चालकासह एकाने तरुणाला चाकूचा धाक दाखवीत खिशातून पैशांसह मोबाईल लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी असलेल्या जितेंद्र राम किशन मोर्या (वय २२) हा तरुण दिनांक १७ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरून एका अनोळखी रिक्षात बसत घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला अनोळखी रिक्षा चालकाने रस्ता बदलवीत या ठिकाणी न नेता मेहरूण तलावाच्या जंगलात नेऊन तू जर पोलिसांना तक्रार करशील तर तुला जिवंत ठेवणार नाही असे बोलून मागे बसलेल्या तरुणांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातून १५ हजार किमतीचा ओपोचा मोबाईल व १ हजार रुपये लुटलेची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे पुढील तपास करीत आहे.