जळगाव मिरर | २२ जून २०२३
भुसावळ तालुक्यातील एका शेतकर्याच्या शेतातील इलेक्ट्रीक पंप चोरीला गेल्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ६ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मांडवेदिगर फाट्याजवळ पकडताच भुसावळ तालुक्यातील लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड थरकाप उडाला आहे. या घटनेत गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
काय आहे घटना ?
कुर्हे पानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी तक्रारदार असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार असून अन्य शेतकर्याची पाच हजार रुपये किंमतीची मोटार अलीकडे चोरीला गेल्यानंतर संबंधित शेतकर्याने तालुका पोलिसांना माहिती कळवली होती. कुर्हे बीटचे हवालदार गव्हाळे यांनी शेतकर्याच्या तोंडी तक्रारीवरून तक्रारदार असलेल्या शेतकर्याशी संवाद साधून संबंधित शेतकर्यांचा तुमच्यावर मोटार चोरीचा आरोप असून प्रकरण मिटवण्यासाठी मला एक हजारांची व मोटार चोरीपोटी पाच हजार रुपये संबंधिताना देण्याची मागणी केली मात्र तक्रारदाराने एसीबीकडे बुधवारी याबाबत तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली. गव्हाळे यांची बुधवारी रात्र गस्त असल्याने त्यांनी ड्युटी आटोपल्यानंतर पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावले. शेतकर्याकडून सहा हजारांची लाच घेताच दबा धरून असलेल्या पथकाने गव्हाळे यांना अटक केली.