जळगाव : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद असे सण सुरु होत आहे. जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. समाजकंटकांना पोलिसांनी इशाराच दिला असून जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. न्यायालयाने निश्चित करून दिलेली ध्वनीची डेसीबल मात्रा ओलांडली तर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ६४६ मिरवणूका, १४७ पुतळा पूजन, ६०० प्रतिमा पूजन, १० दुचाकी रॅली, ४ व्याख्यान, १ भीम गीत कार्यक्रम असे संभाव्य कार्यक्रम होणार आहेत. दि.१५ ते ३० एप्रिल दरम्यान २५० मिरवणूक आहेत. सर्व सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे तब्बल अडीच हजार पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच एक सीआरसीपी प्लाटून देखील लक्ष ठेवून असणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे पुढे म्हणाले कि, जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पसरविले जात आहे. एकाच जातीच्या व्यक्तीकडून खरेदी करू नका, विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी लोडशेडिंग केले जात असल्याची माहिती पसरवत समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे काही प्रकार लक्षात आल्यास नागरिकांनी निनावी तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.
सणोत्सव काळात ध्वनी प्रदूषण केल्यास देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाने निश्चित करून दिलेली ध्वनीची डेसीबल मात्रा ओलांडली तर कारवाई होणार आहे. लोडशेडींगला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, सणोत्सव काळात वीज पुरवठा खंडित करू नये यासाठी आमचा देखील प्रयत्न असेल असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.