जळगाव मिरर | ११ जुलै २०२३
राज्यातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना एका अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात आरोपीने फोन करून ही धमकी दिली आहे. या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
छगन भुजबळ पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास हा धमकीचा फोन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहित मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत त्याने ही धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
प्रशांत पाटील हा मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून त्याने दारूच्या नशेत छगन भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फोन केला होता. तो म्हणाला मी प्रशांत पाटील बोलतोय. मला त्यांना मारायची सुपारी मिळालीय, त्यांना उद्या मी मारणार आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. सुपारी कोणी दिली असं विचारलं असता, दिली अशीच कोणीतरी असंही त्याने सांगितलं. साहेबांनी काय वाईट केलंय तुमचं? त्यांना का मारणार असं विचारलं असता, काय वाईट केलंय ते साहेबांना माहिती असं उत्तर आरोपीनं दिलं. मी सांगून काम करतो म्हणून सांगायचं काम केलं. ठेवा आता, म्हणत त्याने फोन ठेवून दिला. पुणे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
