
जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२३
अनेकदा महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडत असते व या अपघातात अपघातग्रस्त असलेल्या ट्रकमध्ये जर काही मौल्यवान वस्तू असल्याने परिसरातील नागरिक ते घेण्यासाठी मोठी झुंबड उडत असल्याचे व्हिडीओ आपण नेहमीच सोशल मीडियावर बघत असतो अशीच एक घटना धुळे शहरानजीक घडली आहे. या अपघातातील टँकर हे डिझेलचे होते. त्यामुळे येथे देखील तसेच काहीसे झाले
काय आहे घटना ?
धुळे शहरापासून जवळ असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर चंद्रपूरच्या दिशेने जात असेलेले डिझेलने भरलेल्या टँकर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत टँकर चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच उपस्थित नागरिकांना बाजूला करत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी आपले कार्य सुरु केले आहे.
या अपघातामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही जण गेले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून सदर टँकर हा एका बाजूला लावला. मात्र डिझेल टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजुबाजुंच्या अनेक नागरिकांनी धाव घेतली. अनेक जणांनी टँकरमधून बाहेर पडत असलेल्या डिसेलला भांड्यात भरत होते. कुणी पातेले, कुणी ड्रम तर कुणी बादल्या डिझेल पळविण्यासाठी घेऊन आल्याचे व्हिडिओतुन दिसते आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भीडल्या आहेत. महागाईने त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी हे डिझेल मिळेल त्या भांड्यात भरण्यास सुरुवात केली आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले असून हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.





















