
जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२३
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या पश्चिम भागातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटनप्रेमींची संख्या वाढली आहे. हे धरण पहिल्यांदा ओसंडून वाहू लागले आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या या धरणाच्या ओव्हरफ्लोची प्रतीक्षा होती. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. त्यावेळेपासून हे धरण जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी मोशी धरणाप्रमाणे आनंद पर्यटकांना मिळत असल्याचे सांगितले जाते. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या धरणावर यावल, फैजपूर किनगाव, नायगाव, चुंचाळे, कोरपावली तसेच जळगाव, भुसावळ शहरांसह विविध ठिकाणांहून पर्यटक गर्दी करतात. मागील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.





















