
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खराब रस्त्यामुळे अमळनेर-बोहरा बस चिखलावरून घसरली. रस्त्याच्या खाली उतरून ती कलंडण्याच्या स्थितीत असताना सुदैवाने निंबाच्या झाडाला टेकली गेली. त्यामुळे उलटता उलटता वाचली व चालक वाहकासह सर्वजण सुखरूप बचावले.
अमळनेर बोहरा रस्ता अतिशय चिखलमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून पाऊस पडल्यास बस बंद होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ग्रामस्थांच्या विनंतीवरून बस सुरू करण्यात आली होती. सध्या पावसामुळे रस्ता अतिशय चिखलमय झाला आहे. मंगळवारी संध्याकाळची बस बोहरा गावी जात असताना चिखलमातीमुळे बस घसरली व रस्त्याच्या खाली ब्रासमध्ये खोलगट चारीत उतरली. मात्र कडेला लिंबाचे झाड असल्याने झाडाला टेकली गेली. त्यामुळे बस उलटण्याचा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी बस पूर्ण भरलेली होती. चालकाने प्रसंगावधान राखत प्रवासी वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तापी काठावरील या भागात काळ्या मातीचे प्रमाणही जास्त आहे. मंगळवारी पाऊस झाल्याने यारस्त्यावरुन जाणारी वाहने रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला आपोआप सरकतात, त्यामुळे काम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.





















