जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी उच्चशिक्षित असून देखील हाताला काम लागत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत असतांना नुकतेच जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हि भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिया दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची ६२६ पदे भरली जाणार आहेत. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बहुचर्चित जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. संपूर्णपणे ऑनलाईन होणाऱ्या या भरती प्रक्रियेत जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागातील १७ संवर्गातील एकूण ६२६ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी जाहिरात देण्यात येणार असून राज्य पातळीवरील आयबीपीएस कंपनीच्या मार्फत ऑनलाइन परीक्षाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे संपूर्णपणे पारदर्शकता या प्रक्रियेत असणार आहे. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा परिषदेची संपूर्ण तयारी झालेली असून भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल; अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली आहे.