
जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३
राज्यातील अनेक ठिकाणी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पूजा बांधून पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या एका मांत्रिकावर नागपूरच्या चौघांनी फावड्याने हल्ला चढविला. त्यात तो मांत्रिक क्षणातच यमसदनी पोहोचला. १४ ऑगस्ट रोजी रात्री शिवणी शिवारातील एका झोपडीत हा प्रकार घडला. चांदूर रेल्वे येथील मिलिंदनगरातील रहिवासी रमेश मेश्राम (वय ६३,) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा मुलगा उज्ज्वल याच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी १५ ऑगस्टला रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी नागपूरमधील कमलाकार बाबूराव मेश्राम (४५), अक्रम याकुब शहा (२३), कमलाकर साहेबराव चरपे (४४), राजेश अभिमन्यू येसनपुरे (२८) व गाडीचालक मयूर प्रमोद मडगिलवार (२६) यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. चार आरोपींनी खुनाची कबुली दिली. रमेश मेश्रामशी वादावादी झाल्यानंतर आपण त्याला फावड्याने मारल्याचे आरोपींनी सांगितले.
काय घडली घटना
आरोपी १४ ऑगस्टला मेश्रामच्या शेतातील झोपडीत पोहोचले. मांत्रिकाने पूजा मांडून दारू प्राशन केली. नशेत आरोपींना शिवीगाळ केली. चारही आरोपींनी त्याच्या डोक्यात फावड्याच्या दांड्याने व काठीने प्रहार केले. मेश्राम याने आरोपींकडून पैशाचा पाऊस पाडण्याकरिता सौदा करून मोठी रक्कम उकळली होती.




















