
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खान्देशची मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील ( वय ९०) यांचे मंगळवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दहिवद, ता. अमळनेर येथून निघणार आहे. सकाळी सात ते आठ त्यांचे पार्थिव साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात मुख दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
गुलाबराव पाटील हे सुरुवातीला जिल्हा लोकल बोर्डात निवडून आले होते. नंतर १९७८ ला पहिल्यांदा पलोद सरकारमध्ये आमदार म्हणून अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडून आले. यावेळी अडीच वर्षात सरकार बरखास्त झाले. पुन्हा १९८० ला ते निवडून आले. १९८५ ला काँग्रेसचे अमृतराव पाटील यांनी त्यांना पराभूत केले. नंतर १९९० ते ९५ दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. असे तीन वेळा ते एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. त्यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.





















