जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाचा धरणगाव तालुक्यातील पाळधी ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यादरम्यान शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाळधी पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील भूषण संभाजी महाजन – माळी (वय २९) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी तो त्याच्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आला होता. रात्री दहा वाजेनंतर तो शिरसोलीवरून पिंपरखेडला पाळधी मार्गे जायला निघाला होता. विद्यापीठाच्या दिशेने चालत असताना त्याला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. दरम्यान, पाळधी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.