जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२३
देशातील तमिळनाडूमध्ये एका कुटूंबाला शोरमा खाणे चांगलेच महागात पडले आहे. चिकन शोरमा खाल्ल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना तमिळनाडूच्या नमक्कल मध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे हा शोरमा खाल्ल्याने कुटूंबियांसह १२ पेक्षा अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या नमक्कल शहरातील हॉटेलमधून विकत घेतलेला चिकन शॉर्मा खाल्ल्याने 9वीतल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. डी कलैयारासी (१४) असे मृत मुलीचे नाव आहे.मुलीचे वडील धवकुमार (४४), आई सुजाता (३८), भाऊ बुपती (१२), काका सिनोज (६०) आणि काकू कविता (५६) हे तिघेही १६ सप्टेंबरच्या रात्री बाहेर गेले होते. घरी येताना त्यांनी एका हॉटेलमधून चिकन शॉरमा आणि इतर पदार्थांचे पार्सल विकत घेतले. घरी येवून शौरमा खाल्ल्यानंतर घरातील सदस्यांना पोटात दुखू लागले. काही वेळाने सर्वांना उलट्या होऊ लागल्या. प्रकृती ढासळत असल्याचे पाहून सर्वांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
सोमवारी उपचारादरम्यान कलाईरासीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबातील इतर सदस्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलमधून कुटुंबीयांनी जेवण खरेदी केले होते. त्या हॉटेलमधील शोरमा खाल्ल्याने मेडिकल कॉलेजच्या 13 विद्यार्थ्यांनाही विषबाधा झाल्याची तक्रार त्याच रात्री दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.