जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. एरंडोल महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी ट्रकला मागून धडकली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. हि घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग क्र ६ वर एरंडोलनजीक हा अपघात झाला असून यात जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे तर सोबत त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे दुचाकीने पारोळ्याकडून जळगावकडे जात होते. दरम्यान रात्री दहाच्या सुमारास एरंडोल येथे रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीचालक योगेश वानखेडे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सहकारी भगवान सोनवणे हे जखमी झाले. अपघाताचा आवाज येताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी त्वरित अपघातस्थळी पोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासले असता योगेश वानखेडे मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर झालेल्या तरुणाकडून माहिती घेऊन मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.