जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२३
सासरवाडीला पती माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी आला असता आज हरतालिकेचा सण आहे, आपण उद्या जाऊयात असं म्हणत पत्नीने येण्यास नकार दिला. यावरुन पतीला संताप अनावर झाला. या संतापातून त्याने आपल्या ४ महिन्यांच्या पोटच्या बाळाला डांबरी रोडवर आपटलं. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. तळपायाची आग मस्तकात जाईल, अशी ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये सोमवारी १८ सप्टेंबर घडली. संचित बळनुकी (वय ४ महिने) असे मृत बालकाचे नाव आहे. तर बसप्पा रंगप्पा बळनुकी असं नराधम वडिलांचं नाव असून बसप्पा पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी बसप्पाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बसप्पाला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, बसप्पा अथणी तालुक्यातील दुरडुंडी येथील रहिवासी आहे.
१९ महिन्यांपूर्वी बसप्पाचा चिंचली येथील तरुणीसोबत विवाह झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर बसप्पाच्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला. दरम्यान, ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन बसप्पाची पत्नी आपल्या माहेरी गेली. सोमवारी (१८ सप्टेंबर) बसप्पा आपल्या पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेला. यावेळी पत्नीने आज सण आहे, आपण उद्या जाऊया, असे म्हटल्यावर बसप्पाला राग अनावर झाला. त्याने पत्नीला आजच जायचे, असे बजावले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून बसप्पा याने आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटलं. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसप्पाला अटक करण्यात आली आहे.