जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२३
भुसावळ शहरातील द्वारका नगर भागातील ४४ वर्षीय विवाहितेने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील द्वारका नगरमधील रेल्वे परिसरातील सुरेखा जितेंद्र वाघमारे ( वय ४४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी तापी नदीपात्रात विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर रविवारी सकाळी यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजमध्ये या विवाहितेचा मृतदेह आढळला. विवाहिता सुरेखा वाघमारे या शनिवारी सायंकाळी मोपेड (एमएच – १९, सीएन- ४४३१) वरून शनिवारी सायंकाळी पुस्तक घेण्यासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला. मात्र, तपास न लागल्याने विवाहिता हरवल्याची शहर पोलिसांत रात्री १२.३० वाजता नोंद करण्यात आली. तर रात्री तापी पुलावर विवाहितेची मोपेड लॉक केलेली आढळली. त्यानंतर रविवारी सकाळी तापी पात्रात शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजमध्ये या विवाहितेचा मृतदेह आढळला. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. मयूर चौधरी व डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकूल वातावरणात या विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सुरेखा वाघमारे यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.