जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील दोन घरांवर दरोडेखोरांनी रविवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला. यात सोने-चांदीसह अंदाजे तीन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेतानाच दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण केली. त्यात अक्षरश: दीड वर्षाच्या बालकाच्या गळ्यालासुध्दा तलवार लावून धमकावण्यात आले. यात चार जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर सात- आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत व मारहाण करत कपाटातील व अंगावरील सोने काढण्यास देशमुख यांना भाग पाडले यानंतर गोंडगाव मार्गावर घराबाहेरच झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला.
एका खोलीमध्ये झोपलेल्या ताराबाई चव्हाण यांच्यावर तलवार रोखत अंगावरील चांदीचे कडे (गोट) तसेच सोन्याची पोत, कानातले दागिने असा दोन्ही मिळून जवळपास पावणेचार लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत संपूर्ण ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. या घटनेची माहिती मिळताच गावातील काही तरुण घटनास्थळी पोहोचले, मात्र दरोडेखोरांनी तेथून पळ काढला होता. कजगाव येथे पोलिस मदत केंद्र देण्यात आले आहे. मात्र ते नावालाच आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे.