जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३
देशभरातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना आता उत्तर प्रदेशमधून एक भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. वाराणसीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात फक्त ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. लहानग्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारखियांव येथे कार आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सकाळी ७ वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातातील मृत नागरिक पिलीभीत येथील रहिवासी आहेत.
सर्वजण वाराणसीतून देवदर्शन करून परतत असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. वाराणसी जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.