जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२३
राज्यात भाजप व शिंदेंची शिवसेना सत्तेत असल्यावर देखील शिंदे गटाच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीमध्ये फुट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आ.संजय शिरसाठ हे नेहमी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत असतात पण सध्या ते भाजपचे नेते फडणवीस यांच्यावर विधान केल्याने चर्चेत आले आहे.
आ.शिरसाठ म्हणाले कि, ‘देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावं’, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर युतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिरसाठ यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिरसाठ यांना यासाठी समजही दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिरसाठ यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील नेते नाराज आहेत. महायुतीच्या समनव्य समितीच्या बैठीकित शिरसाठ यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. यावर आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे. यावर बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, ”देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रमध्ये रहावं, हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही. त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचं की राज्यात रहायचं हे ते ठरवतील.”
ते पुढे म्हणाले की, ”आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच हवेत, अशी आमची इच्छा आहे. राज्यातील जनतेची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करावे, अशी आहे. राज्यावर आज अनेक संकट आहेत. सरकारने एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे..अशावेळी महायुतीतील वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे.”