जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु आहे, नुकतेच छत्रपती संभाजी नगर जवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना आता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. हि घटना नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली. या दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली.
दुचाकीवर एकूण तीन जण एकत्र प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की दुचाकीवरील एक युवक ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्याने आठ ते दहा फूट फरफटत गेला. या घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून घटनेची माहिती मिळताच तात्काळ विसरवाडी पोलीस दाखल झाले. दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.