जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३ | ‘पेसा’मधून ‘नॉन पेसा क्षेत्रात बदली करण्यासाठी उपशिक्षकाकडून ३५ हजारांची लाच स्वीकारताना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राकेश दिनकर साळुंखे आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय गोरख पाटील यांना गुरुवारी दुपारी धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे उपशिक्षकाची बदली नॉन पेसा क्षेत्रात करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले होते.
शिरपूर तालुक्यातील रामपुरा जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक पदावर तक्रारदार कार्यरत होते. त्यांची बदली पेसा क्षेत्रातून नॉन पेसा क्षेत्रात करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे अर्ज केला. त्या अर्जावर सीईओ यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असा शेरा मारून तो प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे पाठविला होता.
त्यानंतर शिक्षणाधिकारी साळुंखे यांनी तक्रारदाराकडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली. तर शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी ६६ हजारांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदार उपशिक्षक यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला. दुपारी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती २० हजाराची मागणी करून विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. विजय पाटील यांना लाचेचा पहिला हप्ता म्हणून रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरोधात धुळे शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.