जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील एका कंपनीतून काढल्याचा राग आल्याने यशवंत रामकृष्ण महाजन ( वय ६४, रा. संतोषनगर, जळगाव) हे दुचाकीने घरी जात असताना त्यांना प्रमोद नामदेव पाटील (वय ३५, रा. नशिराबाद) यांने बांबूने मारहाण केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील संतोषनगरात यशवंत रामकृष्ण महाजन हे वास्तव्यास असून ते एका कंपनीत अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. याच कंपनीत प्रमोद पाटील हा तरुण कामाला होता. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आल्याने हा राग त्याच्या मनात होता. कंपनीतील अधिकारी यशवंत रामकृष्ण महाजन हे दि. २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुचाकीन जळगाव येथे घरी परतत असताना नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ प्रमोद हा बांबू घेऊन उभा होता. महाजन हे दिसताच त्याने चालू दुचाकीवर त्यांना बांबूने मारण्यास सुरुवात केली. तू मला कंपनीतून का काढले, का काढले, तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या मारहाणीत महाजन यांच्या खांद्याला, पायाला दुखापत होऊन ते जखमी झाले. या प्रकरणी महाजन यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.