जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२३
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रचार व प्रसारण व्हावे आणि गणेशोत्सवाचा प्रगल्भ हेतू साध्य व्हावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर सावरकर समितीला सोबत घेऊन राज्यस्तरीय भव्य दिव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य भरातुन सोशल मीडियाच्या माध्यमातुन सावरकरांच्या जीवनावर आधारित प्रसंग, कार्य, धैर्याला साजेशी आरास मागवल्या होत्या. त्यामध्ये जळगावातील सागर कुटुंबळे व रोहित कुटुंबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी “सावरकरांची त्रिखंडात गाजलेली ऐतिहासिक उडी” हि भव्य आरास साकारलेली होती. या देखाव्यात अतिशय दुर्मिळ पेपर कात्रणे, फोटोसह भारतरत्नाची प्रतिकृती साकरलेली होती. या देखाव्याची चलध्वनी चित्रफीत समितीकडे गणेशोत्सवात पाठवली होती. समितीचे परिक्षक चंद्रशेखर साने, प्रशांत चव्हाण यांनी कुटुंबळेंच्या या देखाव्याला महाराष्ट्रातील तिसरे पारितोषिक घोषित केले.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा ४ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी योगेश सोमण (अभिनेते, वक्ते), सत्यकी सावरकर (वि.दा.सावरकरांचे नातु), देवव्रत बापट (हर घर सावरकर समिती अध्यक्ष) उपस्थित होते व यांच्या शुभहस्ते रोहित कुटुंबळे व सागर कुटुंबळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मुळ प्रतिमा, सन्मानपत्र, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले होते. जळगावातील कुटुंबळे परिवाराला मिळालेल्या यशामुळे सावरकर प्रेमींवतीने कुटुंबळे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे.