जळगाव मिरर | १४ नोव्हेबर २०२३
पारोळा येथील मोठा महादेव चौकाजवळ शहरातील प्रसिद्ध फर्निचर व्यापाऱ्यांच्या घराला आकस्मीत आग लागल्याने घरातील गोदामात ठेवलेले नवीन फ्रिज, एलसीडी, फर्निचरच्या वस्तू व घरपयोगी वस्तूंसह लाखोंचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने जीवित हानी टळली असून घरात असलेले सिलिंडर बाहेर फेकल्याने मोठी हानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रसिद्ध व्यापारी मनोज जगदाळे यांचे गजानन इलेट्रोनिक्स हे मोठे दुकान असून दिवाळीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी फर्निचरचा लाखोंचा माल भरलेला होता. तीन मजली टोलेजंग इमारतीत गोदाम व राहण्यासाठी निवासस्थान आहे. या घराला १३ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घरास आकस्मात आग लागली. काही वेळातच घरात आगीने रौद्ररुप धारण केले. या वेळी परिसरातील अनेकांनी शर्तीचे प्रयत्न करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर तत्काळ पारोळा पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोपर्यंत आगीचे रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अमळनेर, एरंडोल, धरणगाव येथून अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आली नाही. सुमारे ३ ते ४ तास आग सुरुच होती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट झाले नाही. तर आग लागल्याची माहिती मिळताच परिसरतील युवकांसह मित्र मंडळांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तर या तीन मजली इमारतीत गोदाम असल्याने तेथील नवीन फ्रिज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. फ्रिजचे सिलिंडर फुटल्याचे मोठा आवाज येत होता.

मागील दरवाज्याने महिलांना काढले बाहेर घरातील आगीचे रौद्ररुप धारण केल्याने घराच्या पुढील बाजुने आगीचे लोळ उठत होते. याच दरम्यान, घरात अडकलेल्या महिला, मुलांना बाहेर काढले जोखमीचे होते. त्यातच गोंधळ उडाला. शेवटी घराच्या मागील बाजूने शिडी व दोर लावून इमारतीत असलेल्या महिला, मुले व परिवारातील सदस्यांना खाली उतरवण्यात आल्याने जीवित हानी टळली.




















