जळगाव मिरर | १६ नोव्हेंबर २०२३
अनेक गुन्हेगारी घटना या एकतर्फी प्रेमातून होत असल्याचे नेहमीच उघडकीस येत असताना नुकतेच नाशिक शहरात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून काठे गल्ली परिसरातील तब्बल सात वाहने पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यात संबंधित तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. घटना घडल्यानंतर भद्रकाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात सुमित, विकी अशा संशयित आरोपीना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुमित पगारेची व फिर्यादी तरुणीची ओळख असून सुमितने फिर्यादी तरुणीकडे सातत्याने त्याच्याशी लग्न करण्याचा तगादा लावला होता. मात्र तरुणीने वेळोवेळी त्याला नकार दिला होता. संबंधित तरुणीने यावेळीही त्याला नकार दिला. त्यामुळे सुमितला राग अनावर झाला. संतापलेल्या सुमितने त्याचा साथीदार विकीच्या मदतीने सात वाहने पेटवून दिली. यामध्ये तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाचा समावेश आहे. ही सर्व वाहने जळून खाक झाली आहेत.
स्थानिकांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बहुतांश वाहने जळून राख झाली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच या दोघांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.