जळगाव मिरर | २० नोव्हेबर २०२३ | राज्यात मराठा व धनगर समाज आरक्षणावर आक्रमक होत असतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट केला. त्यात बावनकुळे कथितपणे जुगार खेळताना दिसून येत आहेत. अवघा महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे राऊत म्हणालेत. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू झालेत.
संजय राऊत यांनी सोमवारी सलग 3 ट्विट केले. या ट्विटसोबत त्यांनी टाकलेल्या फोटोत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनोत जुगार खेळताना दिसून येत आहेत. संजय राऊत आपल्या एका ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…
संजय राऊत यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये बावनकुळेंवर जुगारमध्ये तब्बल 3.50 कोटी रुपये उडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 19 नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.