जळगाव मिरर | २१ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक विचित्र अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शनिवारी एक विचित्र अपघात घडला आहे. मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 6 ते 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. त्यानंतर टेम्पोने अनेक वाहने उडवली. मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटाजवळ शनिवारी हा अपघात घडला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये अनियंत्रित टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिलेली दिसत आहे.
आधी रस्ता ओलांडणाऱ्या एका कारला चिरडल्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराला या टेम्पोने धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच रस्त्यावर असलेल्या कारला देखील या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार उडून बाजूला पडल्याने थोडक्यात बचावला मात्र दुचाकी आणि इतर कारचे नुकसान झाले.