जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२३
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतांना शासनाकडून दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्याचे नमुद करण्यात आले आहे. ‘दुष्काळ सदृष्य’ या शब्दामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे हा शब्द वगळून जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना केळी पिक विमा मिळाला काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्वरीत पिकविम्याचा लाभ द्यावा. या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. ३० रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या मोर्चात बैलगाड्यांसह ३०० ते ४०० ट्रॅक्टर व १२ हजार ते १५ हजार लोकांचा सहभाग राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहिल, अशी माहिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झालेली असून अवैध धंदे मोठ्याप्रमाणात फोफावले आहे. चोरीच्या घटना देखील मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. या घटनावर नियंत्रण आणावे, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आक्रोष मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी मंत्री देवकर यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे ह्या देखील दि.२९ रोजी पारोळा येथे डॉ. सतिष पाटील यांच्याकडे एका कार्यक्रमानिमित्त येत असल्यामुळे त्यांना देखील आक्रोष मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली जाणार असल्याचे देखील देवकर यांनी सांगितले