जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना नियमित उघडकीस येत आहे तर खुनाच्या घटनेत देखील अनेक दिवसापासून वाढ होत आहे. अशीच एक घटना धुळे शहरात घडली आहे. २१ वर्षीय तरुणी घरी एकटी असतांना अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमागे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. निकिता कल्याण पाटील (21) असे मृताचे नाव असून खुनाचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, ओळखीतील परीचीतानेच हा खुन केल्याचा नातेवाईकांना संशय असून काही नावेदेखील पोलिस प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमागे निकिता कल्याण पाटील ही तरुणी वास्तव्यास होती. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच असताना अज्ञात आरोपीने तीक्ष्ण हत्याराने त्याच्या गळ्यावर वार केला. तरुणीने या प्रकारानंतर आरडा-ओरड केल्यानंतर रहिवासी जमा झाले मात्र तो पर्यंत आरोपी पसार झाला. निकिता हिच्या गळ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली. खुनानंतर अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबी निरीक्षक दत्ताजी शिंदे, देवपूरचे निरीक्षक सतीश घोटेकर, पोलिस कर्मचारी मिलिंद सोनवणे, ठसे तज्ज्ञांनी धाव घेतली.