अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. सदर घटना अमळनेर तालुक्यातील गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) हे पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभे असलेले ट्रॅक्टर दिसले नाही. यामुळे ट्रॅक्टरला मागून दुचाकीची धडक लागली. त्यात युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगलबाई या जखमी झाल्या होत्या.
जखमी झालेल्या मंगलाबाई यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन मुली आहेत. दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यू प्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.