जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात बेकायदेशीर घटना घडत असून नुकतेच चोपडा तालुक्यातील गलंगी गावाजवळ दोन व्यक्ती दुचाकी (एमएच- १९, एजे- ८५९६) ने गांजाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ रोजी केलेल्या कारवाईत दोघांकडून ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना ताब्यात घेतल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्या माहितीच्या आधारावर चोपडा ते शिरपूर रस्त्यावरील गलंगी गावाजवळ मोटरसायकलने जात असलेले अशपाक पिंजारी व शेख रियाज जाकीर यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे ३९ हजाराचा साडेसहा किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील अश्पाक रेहमान पिंजारी (वय ३२) व सिल्लोड येथील शेख रियाज शेख जाकीर (वय २६) यांच्याकडून चोपडा ग्रामीण पोलिसांनी ३९ हजारांचा साडे सहा किलो गांजा व दुचाकी असा एकूण ७९ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केली. या दोघांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितननवरे, पोहेकॉ राकेश पाटील, रावसाहेब पाटील यांनी केली. शासकीय पंच म्हणून नायब तहसीलदार सचिन बांबळे उपस्थित होते. दोघांनाही चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.