पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक नरेंद्र रामदास ठाकरे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. सदरचा पुरस्कार दि. १ मे रविवार रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे (जळगाव) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मान पत्र व १० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुद्धिबळ खेळात नॅशनल आर्बिटर म्हणून राष्ट्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख व मुख्याध्यापक सुधीर पाटील सह शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.