जळगाव मिरर । १७ डिसेंबर २०२३
जळगाव शहर व जिल्ह्यातील विकासाचा ध्यास घेऊन विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे वेळेत काम पूर्ण होऊन लोकार्पण होत आहे. निम्न-तापी-पाडळसे सारखे अनेक प्रकल्प जिल्ह्यात वेळेत मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नुसतं जळगाव शहराचा विकास होत आहे असे नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा बदलतोय, विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे काढले.
जळगाव शहराचा विकासाचा सेतू ठरणारा पिंप्राळा गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाचे नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण झाले. या कार्यक्रमात जळगावहून सहभागी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. याप्रसंगी जळगाव येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार अर्पित चव्हाण, महारेलचे सरव्यवस्थापक निशांत जैन, भुसावळ रेल्वे प्रशासनाचे प्रबंधक संजय बिराजदार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रिंप्राळा उड्डाणपूलाचे भूमिपूजन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी माझ्याच हस्ते झाले. त्यानंतर आता दोन वर्षाच्या कालावधीच्या आत या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले. पूलाचे वेळेत काम पूर्ण करण्याचे श्रेय कॉन्ट्रॅक्टरला जाते. येत्या काही दिवसांत आसोदा पुलाचे लोकार्पण होणार आहे.
जळगाव शहर व जिल्ह्यातील निराशाचे वातावरण दूर होत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी मनपाला जिल्हा नियोजन मधून सव्वाशे कोटी रूपये देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आमदार एक हजार कोटींचे कामे करत आहे. खेडी-भोकरी-भोकर पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील आम्ही तिन्ही मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे निम्न-तापी-पाडळसे प्रकल्पास मंत्रीमंडळाने साडेचार हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे पाच तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. बंधारासह बांभोरी पूल व्हावा यासाठी प्रयत्न आहे. संपूर्ण जळगाव जिल्हा झपाट्याने बदलत आहे. प्रिंप्राळा उड्डाणपूल शहर व ग्रामीण जिल्ह्याला जोडणारा विकासाचा सेतू ठरणार आहे. अशी आशा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्रामविकास मंत्री श्री.महाजन म्हणाले की, प्रिंप्राळा उड्डाणपूलामुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शहरातील सर्व रस्ते आता सिमेंटचे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २५० कोटी खर्चून विभागीय क्रीडा संकुल साकार होणार आहे. जिल्ह्यात देशातील पहिले मेडीकल हब साकार होत आहे. येत्या दोन वर्षांत याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत.शहर व जिल्हा विकासाकडे वाटचाल करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था येत्या काळात जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे.
यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांचीही भाषणे झाली. उड्डाणपुलासाठी जमिनी दिलेले शिवाजीराव भोईटे, लता भोईटे यांच्यासह इतरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उड्डाणपुलाचा प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल मक्तेदार प्रताप शेखावत यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
उड्डाणपूलाविषयी थोडक्यात
महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘महारेल’ ( महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ) द्वारे पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.जळगाव ते शिरसोली स्थानकादरम्यान असलेल्या पिंप्राळा रेल्वे फाटक क्रमांक १४७ वर असलेला हा रेल्वे उड्डाणपूल दोन लेनचा आहे. पूलाची लांबी १००५.६२ मीटर असून रूंदी ८.५ मीटर आहे. या उड्डाणपूलास ५३ कोटी ९१ लाख खर्च आला आहे. रिंग रोडपासून सुरू झालेला हा उड्डाणपूल थेट कानळदा रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगावकरांना विलंबाशिवाय आता थेट शिवाजीनगरसह प्रस्तावित राज्यमार्गावरून थेट चोपडा तालुक्याकडे मार्गस्थ होता येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा एक आर्म पिंप्राळा उपनगराकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेल्वे फाटकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडीची समस्याही दूर होणार आहे.