जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
धरणगाव तालुक्यातील साखरे गावात शॉर्टसर्किटमुळे अचानक ४ घरांना भीषण आग लागल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली आहे. या आगीत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस जळून खाक झाला आहे. धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील साखरे येथे १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरात ठेवलेल्या कापसाला आग लागली. त्यामुळे घराच्या बाजूला असलेल्या इतर ३ घरांना ही आगीने आपल्या विळख्यात घेतले. यामुळे घरातील साहित्यासह शेतीपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर थोड्या वेळाने धरणगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब ही घटनास्थळी दाखल झाला. या बंबाच्या मदतीने लागलेली आग विझवण्यात यश मिळाले. या आगीत शेतकऱ्यांच्या घरात ठेवलेला कापूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात धरणगाव पोलिसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. या आगीत साखरे येथील शेतकरी रमेश वना पाटील, विकास वना पाटील, स्वप्निल अमृतकर आणि तिरुणाबाई वना पाटील या चौघांच्या घरातील काही रोकड, साहित्य आणि कापूस जळून खाक झाला आहे.